नागपूर (वृत्तसंस्था) शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला असेल तरच तो लैंगिक अत्याचार ठरु शकतो, असा महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात महिलांच्या चारित्र्याला धक्का पोहोचवणारी असल्यानं हा गुन्हा भारतीय दंडविधानाच्या ३५४ कलमांतर्गत येतो. यानुसार आरोपीला १ वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
लैंगिक आत्याचार प्रकरणी ३९ वर्षीय आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली होती. या आरोपीनं शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावेळी कोर्टानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. पोक्सो या कायद्यानुसार आरोपीनं लैंगिक अत्याचाराच्या हेतूनं मुलांच्या खासगी अवयवांना थेट स्पर्श करणं आवश्यक आहे. या प्रकरणात असा कोणताही गुन्हा घडला नाहीये. फक्त कपड्यावरुन मुलांच्या शरीराची चाचपणी करणं ही कृती लैंगिक अत्याचार ठरु शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.
नागपूरमध्ये २०१६ साली घडलेल्या या प्रकरणात ३९ वर्षीय आरोपीनं १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी पॉक्सो कायद्यांतर्गंत आरोपीला तीन वर्षांची शिक्षा करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीनं पीडित मुलीच्या छातीला पकडून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता.