जळगाव प्रतिनिधी । शारीरिक तंदुरुस्तीकरीता नियमित व्यायामाची आवश्यकता असते. याकरीता “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवु शकतात. आपण आपल्या परिसरात कुठेही धावणे, चालणे किंवा सायकल चालवून शासनाकडुन प्रमाणपत्र प्राप्त करु शकतात. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याबाबतची नियमावली खालीलप्रमाणे.
“फिट इंडिया फ्रीडम रन ” उपक्रमातंर्गत आपणास चालणे, धावणे व सायकल चालवायची आहे. आपल्यास अनुकूल वातावरणानुसार व उपलब्ध असलेला मार्ग निवडून उपक्रमात सहभागी व्हावे, आपण सायकल चालवतांना, धावत असताना व चालतांना मध्ये कुठेही थांबू शकता. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रंकिंग ॲप किंवा जी.पी. एस. घड्याळाचा वापर करुन आपण चालवलेले सायकलचे अंतर, धावलेले अंतर अथवा चाललेले अंतर किलोमीटर मध्ये मोजावे, आपले अंतर मोजल्यावर ट्रॅकिंग ॲपचा स्क्रीन शॉट काढावा.
सहभागी होण्याची पध्दत
सदरचा उपक्रम सर्वासाठी खुला आहे. आजपासुन ते 2 ऑक्टोंबर, 2020 पर्यत आपण सायकल चालविणे, धावणे व चालणे उपक्रम कधीही करु शकता. सायकल चालविणे, धावणे व चालणे उपक्रम पुर्ण केल्यानंतर आपले अंतर मोजल्यावर ट्रॅकिंग ॲपचा स्क्रीन शॉट व आपला स्वत:चा फोटो व आपली सर्व वैयक्तीक माहीती https://fitindia.gov.in/fit-india-freedom-run-registration या लिंकवर क्लिंक करुन भरावी. पूर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई- प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. याप्रमाणेच https://forms.gle/QfBUmaqzYh८STG५f६ या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरण्यात यावी. आपण वरील तीनही अथवा आवडत्या अथवा सराव असणा-या एका उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. या उपक्रमात आपण सामाजिक अंतर राखण्याच्या निकषानुसार सहभागी व्हायचे आहे.
तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी “फिट इंडिया फ्रीडम रन” या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.