नागपूर (वृत्तसंस्था) एका गणिताच्या शिक्षकाने अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या पाच महिण्यापासून अत्याचार करत असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या प्रयोगशाळेतच त्याने अनेकदा कुकृत्य केले. नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. संजय विठ्ठल पांडे (५७) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत सहावी इयत्तेत आहे. आरोपीने तिला विश्वासात घेऊन प्रेम असल्याचे सांगितले व तिच्याशी लग्नाची इच्छा प्रदर्शित केली. विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात फसली. त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर शाळेतच अनेकदा अत्याचार केले. १० डिसेंबर २०२२ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीने पोट दुखत असल्याचे तिच्या आईला एक-दोन वेळा सांगितले होते. पण आईने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आईने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन आणखी माहिती विचारली असता तिने सगळा प्रकार सांगितला.
५ एप्रिल रोजी घरी आल्यावर तिने शाळेतील गणिताचे शिक्षक संजय विठ्ठल पांडे (५७) यांचे नाव सांगितले. पांडे पीडित मुलीला पेपर सुटल्यानंतर विज्ञान प्रयोग शाळेत नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते, असे मुलीने आईला सांगितले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पांडे याने लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार संबंध ठेवल्याचे सांगितले. ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली. दरम्यान, गणिताचा शिक्षक बहुतांश वेळा विद्यार्थिनीला विज्ञानाच्या प्रयोगशाळेत घेऊन जात होता. ही बाब शाळेत कुणालाही का खटकली नाही ? हा प्रश्न उपस्थित करत सेवानिवृत्तीला आलेल्या या वासनांध शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक संजय पांडे याला अटक केली आहे.