मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता विकास बहल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर काल प्राप्तिकर विभागानं धाड टाकली. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल २२ ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे. ही छापेमारी रात्रभर सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली.
मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला. टॅक्स चोरीच्या प्रकरणात आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. मात्र, आता या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुराग कश्यप, तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल, मधू मंटेना आणि फँटम फिल्मशी संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाला माहिती मिळाली होती की फँटम सिनेमाच्या कमाईत टॅक्सची चोरी झाली होती. फँटम सिनेमात जो पैसा कमावला गेला त्याची योग्य माहिती देण्यात आलेली नाही.
आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या छापेमारीत अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. टॅक्स चोरीच्या रकमेचं वाटप कसं झालं? यातून काय काय खरेदी करण्यात आलं किंवा मनी लॉण्ड्रिंगसाठी ही रक्कम परदेशात तर पाठवली गेली का? याची माहिती आयकर विभाग घेत आहे. आयकर विभागाने मुंबई, पुणे येथे २२ ठिकाणी छापेमारी केली. अनुराग कश्यपच्या फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला. आयकर विभागाचं पथक फँटम फिल्मच्या कार्यालयातही गेलं होतं. आज देखील ही कारवाई सुरु राहू शकते.
मधू मंटेना यांच्या मुंबईतील घरावरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मधू मंटेना यांची कंपनी क्वान टॅलेंट मॅनेजमेंटच्या अंधेरी येथील कॉमर्स सेंटरवरही आयकरच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यानंतर क्वान कंपनीचे चार अकाऊंट्स सीज करण्यात आले.