अहमदाबाद (वृत्तसंस्था) देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘वाघ बकरी’ चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात पराग देसाई आपल्या घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यादरम्यान भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात ते घसरून पडले आणि त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
पराग देसाई १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना ही घटना घडली. रस्त्यावर पडल्यानंतर एका सुरक्षा रक्षकाने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि देसाई यांना उपचारासाठी जवळच्या शेल्बी रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर त्यांना झायडस रुग्णालयात हलवण्यात आले. पराग देसाई सात दिवस व्हेंटिलेटरवर होते. पराग देसाई यांच्यावर ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र प्रकृतीच्या अनेक गुंतागुंतीमुळे देसाई यांचे प्राण वाचू शकले नाहीत. सोमवारी सकाळी ९ वाजता अहमदाबादमधील थलतेज स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
पराग देसाई हे वाघ बकरी टी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई. यांचे पुत्र होते. देसाई यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले. पराग देसाई हे वाघ बकरी ग्रुपमधील चौथ्या पिढीतील उद्योजक होते. समूहाला देशातील पहिल्या तीन चहा कंपन्यांमध्ये स्थान देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९९५ मध्ये जेव्हा ते कंपनीत रुजू झाले तेव्हा त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये होती. आज कंपनीचा व्यवसाय सुमारे २,००० कोटी रुपयांचा आहे. कंपनीचा व्यवसाय देशातील २४ राज्ये आणि जगातील ६० देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांना ३० वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव होता. ते चहाचे चाहते होते आणि वाघ बकरी ग्रुपचा आंतरराष्ट्रीय व्यवसायही पाहत होते.