पारोळा (प्रतिनिधी) शेतीचे साहित्य घरी नेत असताना समोरून आलेल्या हार्वेस्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोन जण ठार झाले. ही घटना भोकरबारी फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. संतोष बाबूराव पाटील (६०) आणि अविनाश देवीदास पवार (३६, दोन्ही रा. कंकराज, ता. पारोळा) अशी मृतांची नावे आहेत.
संतोष पाटील व अविनाश पवार हे गुरुवारी सायंकाळी शेतीचे साहित्य घेऊन दुचाकीने पारोळ्याकडून कंकराजकडे निघाले होते. वाटेत भोकरबारी धरणाजवळ समोरून आलेल्या हार्वेस्टरने दुचाकीला धडक दिली. यात दोघे जबर जखमी झाले. त्यांना लागलीच पारोळा कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. तिथे संतोष पाटील यांना मृत घोषित करण्यात आले. अविनाश यास पुढील उपचारासाठी धुळ्याकडे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. संतोष पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा, तर अविनाश पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण व मुले, असा परिवार आहे.