जालना (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजता उभ्या कंटेनरवर कार धडकल्याने तीन जण जागीच ठार झाले. रामोजी शिवराज तिजारे (५०), मालुबाई पुरी (७०), शांताबाई पुरी (४५) अशी मृतांची नावे आहेत.यातील मालुबाई आणि शांताबाई ह्या माय-लेकी आहेत.
नागपूर येथील जगनाडे चौक भागात राहणाऱ्या मायलेकी मालुबाई पुरी व त्यांची मुलगी शांताबाई पुरी या गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे धार्मिक विधीसाठी रामोजी शिवराज तिजारे यांची कार घेऊन गेल्या होत्या. विधी आटोपल्यानंतर मालुबाई, शांताबाई, रामोजी व त्यांचा मुलगा सूरज तिजारे (२२) हे कारने नागपूरकडे जात होते.
दुपारी एकच्या सुमारास निधोना येथे रामोजी तिजारे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावर बाजूला उभ्या कंटेनरला धडक देत दुभाजकावर जाऊन धडकली. यामध्ये रामोजी तिजारे, मालुबाई पुरी आणि शांताबाई पुरी हे तिघेजण जागीच ठार झाले. तर रामोजी तिजारे यांचा मुलगा सूरज तिजारे हा जखमी झाला असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.