मुंबई (वृत्तसंस्था) कोव्हिड लसीकरण केंद्रात एक व्यक्तीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात हा प्रकार घडला. यात कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर चक्कर येऊन ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्य़ेष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याशिवाय ज्यांना अनेक आजारांनी ग्रासलं आहे आशा रुग्णांसाठी ही लसं देण्यात येणार आहे. दरम्यान लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये राहात होती. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबीयांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
















