प्रयागराज (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत मतांसाठी गॅरंटी कार्डच्या माध्यमातून मतदारांना वेगवेगळ्या लाभांचे आमिष दाखविणाऱ्या काँग्रेसच्या ९९ खासदारांना अपात्र घोषित करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालयाकडून लवकरच सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस खासदारांनी ‘घर घर गॅरंटी योजने’ अंतर्गत गॅरंटी कार्डच्या माध्यमातून दिलेली आश्वासने ही लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लाच देण्याप्रमाणे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ९९ खासदारांना विद्यमान कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयोगदेखील काँग्रेसवर कारवाई करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. निवडणुकीतील निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी तत्काळ न्यायिक हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे. ‘घर घर गॅरंटी’ योजना ही लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लाच देण्याप्रमाणे आहे. भादंसंनुसार देखील यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असा युक्तिवाद याचिकेतून करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने २ मे २०२४ रोजी दिशानिर्देश जारी करत, राजकीय पक्षांना अशा प्रकारचे आमिष न दाखविण्याचा इशारा दिला होता. तरीही काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राखली नाही. त्यामुळे काँग्रेसचा राजकीय दर्जा काढून घेण्यात यावा, तसेच काँग्रेस खासदारांना अपात्र ठरविण्याबरोबरच योजना आणण्यासाठी जबाबदार लोकांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी न्यायालयाने निर्णायक पाऊल उचलावे, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे.