जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संजय पवार गट अशी आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीच्या प्रचारपत्रिकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही छायाचित्र लावले आहे. हे छायाचित्र आणि पक्षाचे नाव काढून टाकावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आघाडी केली आहे. त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे फोटो आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी पक्षाकडे अहवाल पाठवला होता. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संजय पवार यांना पत्र देऊन, अजित पवार यांचा फोटो आणि पक्षाचे नाव वापरू नये असे सांगितले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, येत्या २८ एप्रिल रोजी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. शिवसेना-भाजप- राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवीत आहोत असे बॅनर पवार यांनी लावलेले आहेत. पक्षामध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणताही गट नाही, असे असताना संजय पवार गट असा उल्लेख करून आपण पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादी पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो काढावेत, अन्यथा आपल्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेशाच्या पत्रात म्हटले आहे.