पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नुकतेच जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु येथील ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.
गावात आज मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार बंद करण्यासाठी सकाळपासून प्रयत्न करणे अपेक्षित होते. पण ग्रामपंचायत प्रशासनाने दुपारी गावात दवंडी देऊन व रिक्षा फिरवून बाजार बंद असल्याचे सांगितले. तसेच बाहेरगावाहून आलेले भाजीपाला विक्रेते तसेच किरकोळ विक्रेते हे बाजारासाठी आले. त्यामुळे बाजार बंद करण्याचे आदेश असून सुद्धा बाजार बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या भाजीपाला विक्रेते तसेच इतर किरकोळ विक्रेते विना मास्क रोडावर आपले दुकान लावून भाजीपाला विक्री करीत आहे.
बाजारासाठी आलेली प्रचंड गर्दी पाहता गावात तसेच परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. व गावात कोरोनाचा शिरकाव लवकरात लवकर होऊन त्याचे परिणाम घातक होण्याची चिन्ह दिसत आहे. याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन राहील. तरी संबंधित प्रशासनाने लक्ष देऊ ग्रामपंचायत प्रशासनावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.