जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंगजी अभ्यास मंडळासह अनेक समितींवर कार्यरत असलेले डॉ.अविनाश बडगुजर, नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाचे इंग्रजीचे पुस्तक ‘Reading Literature’ हे संकलीत व प्रकाशीत केले आहे. मात्र, हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी उघडपणे व बिनबोभाटपणे वाङमयचौर्य केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अॅड.कुणाल पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अॅड.कुणाल पवार यांनी म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लपाछपीचा पुन्हा एक नमुना समोर आलेला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासुन जळगाव विद्यापीठामध्ये काही विशेष लोकांसाठी व त्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासन काम करित असल्याची अनेक उदाहरण याआधी उघड झालेली आहेतच. यामाध्यमातुन विद्यापीठाचे मा.कुलगुरु व त्यांचे बहुतेक अधिकारी हे त्यांचे अधिकार विसरुन फक्त आपआपला कार्यकाळ पुर्णत्वाकडे नेण्यातच धन्यता मानतांना दिसत आहेत. समोर असलेल्या माहितीनुसार विद्यापीठामध्ये ईंग्रजी अभ्यास मंडळासह अनेक समितींवर कार्यरत असलेले डॉ.अविनाश बडगुजर, नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाचे इंग्रजीचे पुस्तक ‘Reading Literature’ हे संकलीत व प्रकाशीत केले. मात्र हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यांनी उघडपणे व बिनबोभाटपणे वाङमयचौर्य केल्याचे स्पष्ट होत आहे. यासंबंधी अधिक माहिती घेतली असता असे समजते कि, डॉ.अविनाश बडगुजर यांनी ‘Literary Forms, Trends and Movements (Rama Brothers) या पुस्तकातुन पान क्र. 28 ते 41 ही पाने जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहेत. तसेच इतरही अनेक पानेची पाने इंटरनेटवरुन उचललेली दिसतात.
कुलगुरुंकडे या सर्व प्रकरणाची तक्रार केली गेली असून त्यासंदर्भात एक तज्ञ चौकशी समितीसुध्दा गठीत झाल्याचे सुत्रांकडून कळाले. विद्यापीठाच्या सद्याच्या कार्यपध्दतीनुसार फक्त समिती नेमली गेली आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांपासुन कोरोनाचे कारण पुढे करुन या समितीचे प्रत्यक्ष कामकाजच अजून सुरु झाले नसल्याचे समजते. परंतु कुलगुरू शेतकरी यांचे कोर्टात पैसे भरण्याचे त्यांच्या कुलसचिवमार्फत कोर्टात पंधरा दिवसासाठी भरण्याचे हो म्हणतात आणि नंतर त्यावर एका आरोपी असलेल्या व्यक्तीची तीन सदस्यीय समिती बेकायदेशीरपणे कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्यासाठी नेमल्याचाही आरोप अॅड.पवार यांनी केला आहे. चौकशी समिती लॉकडाऊनमध्ये पण काम करते आणि या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यासाठी दबावाला बळी पडून टाळत आहे. म्हणजेच काही तरी आर्थिक किंवा पदाचा दुरुपयोग सुरू असल्याने असे घडत आहे. तसेच डॉ.अविनाश बडगुजर हे स्वतः पीएच.डी.धारक असून ते इंग्रजी विषयामध्ये पीएचडीचे मार्गदर्शकसुध्दा आहेत. मात्र, विद्याचवाचस्पतीसारख्या सर्वोच्च पदवीचे मार्गदर्शकच जर वाङमयचौर्य करित असतील तर त्यांचे स्वतःचे संशोधन व त्यांचे मार्गदर्शनाखाली होणारे इंग्रजी भाषा व साहित्याचे संशोधन यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा शिक्षकांचा व मार्गदर्शकांचा त्यांचे विद्यार्थी काय धडा घेणार व संशोधनाचा काय दर्जा राखल्या जाणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने अॅड.पवार यांनी उपस्थित केले आहेत.
वाङमयचौर्यसारख्या गंभीर बाबीची चौकशी ही संबधीत दोन पुस्तकांचा अभ्यास करुन आॉनलाईन पध्दतीनेसुध्दा अहवाल सादर केल्या जाऊ शकतो व पुढील कार्यवाही विद्यापीठाला करता येते. मात्र, या सर्व बाबी प्रशासनाच्या व प्रशासम चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तिवर व कार्यक्षमतेवर अवलंबुन असल्याने या वाङमयचौर्यचासुध्दा विद्यापीठाच्या इतर अनेक घोटाळ्यांसारखा पर्दाफाश होईल का नाही याबाबत सर्वंनाच शंका वाटत आहे. तसेच अशा प्रकारचे गंभीर आरोप असणाऱ्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सर्व पीएचडीच्या पदवी रद्द करण्यात याव्यात, अशा अनेक घोटाळ्यांकडे व विद्यापीठाचा दर्जा ढासळविणाऱ्या घटनांकडे डोळेझाक न करता लवकरात लवकर याचा खुलासा करावा, असे आव्हान राष्ट्रवादीचे सचिव अँड. कुणाल पवार यानी केले आहे.