पुणे (वृत्तसंस्था) राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल (शुक्रवारी) बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
दरम्यान, “दिंडी निघाली आहे, आता थांबणं शक्य नाही, पायी वारी पूर्ण करणारचं”, असं सांगत बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी संदर्भातील आपली भूमिका शुक्रवारी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केली होती. पायीवारी करण्यासाठी आपण आळंदीत दाखल होणार असा इशारा बंडातात्यांनी दिला होता. कराडकरांच्या इशाऱ्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात होते. परंतु, बंडाताता कराडकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. अशातच आज पहाटे काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. त्यावेळी या वारकऱ्यांना सोडवण्यासाठी दाखल झालेल्या बंडातात्या कराडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच
वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.