अमळनेर (प्रतिनिधी) शहरात दमदाटी करून पैसे हिसकावणे, मारामारी करून दहशत पसरवणे अशा विविध गुन्ह्यातील एका संशयिताला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची दहशत कमी करण्यासाठी संशयिताची अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत पोलिसांनी गुरुवारी धिंड काढली. दरम्यान, गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ही कठोर पावले उचलली असल्याचे बोलले जात आहे.
शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद असं मुख्य गुन्हेगाराचं नाव आहे. अमळनेर व चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने लोकांना हेरून बेदम मारहाण करून दरोडा टाकणे, एकट्यादुकट्या माणसाला गाठून रस्त्यात लुटण्याचे २३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. २ फेब्रुवारी रोजी संशयित शुभम देशमुख हा अमळनेर शहरात पत्नी व सासूकडे आल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, सुनिल हटकर, पोलीस नाईक दिपक माळी, मिलींद भामरे, सुर्यकांत साळुंखे, रविंद पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, रोहिदास आगोणे, सागर साळुंखे यांनी शहरातील गलवाडे रोड प्रताप मिल येथे सापळा रचला. शुभम देशमुख याने पोलिसांना पाहून भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. पळताना त्याच्या पायाला दुखापत झाली व तो पोलिसांच्या हाती लागला. त्याचप्रमाणे त्याचा साथीदार राहुल किशोर वानखेडे याला देखील त्याच्या राहत्या घरातून दुसऱ्या पथकाने अटक केली.
शुभम उफ शिवम उर्फ दाऊ मनोज देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. तो व त्याचा साथीदार राहुल किशोर वानखेडे हे दोघे अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरिकांकडून बळजबरीने पैशांची वसुली करत होते. त्यांच्याविषयी शहरात कमालीची दहशत होती. सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकून अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत त्यांची पायी धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.