गंगापूर : पोलिसांनी अनोळखी इसमाचा पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे.
गुरूवारी (दि.९) गंगापूर तालुक्यातील पेंडापूर शिवारातील शोभा खोतकर यांच्या शेत गट नं. ७६ मध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार येथील पोलीस पाटलांनी गंगापूर पोलिसांना कळताच मृत व्यक्तीचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास अधिकारी पोउपनि
अझर शेख यांनी मयतासंदर्भात शोधपत्रिका जाहीर केली होती. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. तोपर्यंत मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवलेला होता.
दरम्यान, कुणी नातेवाईक येत नसल्याचे पाहून शेवटी पोउपनि अझर शेख यांनी सर्व सोपस्कर करून मृतदेह शहरातील शासकीय जागेमध्ये पुरला केला होता. यानंतर मयताचा मुलगा हेमंत मोहन दोडके, (रा. कासेवाडी, भवानी पेठ जि. पुणे) हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल होत पेंडापूर शिवारात आढळून आलेला मृतदेह अज्ञात नाही तर ते माझे वडील होते, त्यांचे नाव मोहन भागुजी दोडके असून ते ६ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोहन भागुजी दोडके (५७) हे लघुशंकेला जातो असे म्हणून गेले ते परत आले नाहीत. त्यानंतर ते मिसिंग असल्याबाबत नेवासा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती असे म्हणून वडिलांचे प्रेत माझ्या ताब्यात द्या असे म्हटले.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याच वडिलांचा मृतदेह असल्याची खात्री पटली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सदर बाब तपास अधिकारी पोउपनि अझर शेख यांनी मयत व्यक्तीच्या मुलाला सांगितल्यानंतर ‘रीतीरिवाजाप्रमाणे माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करायचे आहे. तेव्हा शासकीय जागेत पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून माझ्या ताब्यात द्यावा’ अशी मागणी मयत व्यक्तीच्या मुलाने केल्यावर पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत मृतदेह ज्या ठिकाणी पुरला केला होता. ती जागा शोधून तो मृतदेह पुन्हा उकरून नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे.