चाळीसगाव (प्रतिनिधी) प्रतिक्षा गणेश गवळी या तरुणीने आपल्या अत्यंत गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. तिने आज माहिती तंत्रज्ञान (आय.टी) क्षेत्रात उंच भरारी घेतली असून आपल्या आई-वडिलांचे पांग फेडण्याचे काम या प्रतीक्षाने केले आहे.
प्रतिक्षा अवघी नऊ वर्षांची असताना तिच्या आईचे छत्र हरपले. आजारपणात प्रतिक्षाची आई वारली. तिच्यापेक्षा दोन लहान भावंडे अजून होते. वडिलांसोबतच दोन लहान भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी या नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर आली. वडील गणेश आप्पा गवळी हे गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर उचलण्याचे काम करीत असत. सतत बारा वर्षे त्यांनी ही नोकरी केली. ६०० रुपये पगार पासून ते १८०० रुपये इतक्या मोजक्या पगारावर त्यांनी काम केले आणि आपल्या लहान मुलांचे संगोपन केले. मुलांची हेळसांड होऊ नये म्हणून गणेश गवळी यांनी नातेवाईकांच्या आग्रहाखातर दुसरे लग्न केले आणि प्रतीक्षा सहित दोन भावंडांना नव्या आईचे छत्र मिळाले. नवी आई सौ वैशाली गणेश गवळी यांनी देखील या मुलांना आपलेसे करून अत्यंत मायेने वाढवले. कधीही परकेपणा भासू दिला नाही म्हणून आपल्या अभ्यासात प्रतिक्षाचे नेहमी मन रमू लागले. गणेश गवळी यांची भक्कम साथ होती ती म्हणजे वर्धमान भाऊ धाडीवाल यांची हे दोघे मित्र जणू एकमेकांसाठी राम-लक्ष्मण. प्रतिक्षा अभ्यासात आपली चुणूक दाखवू लागली. वर्धमान भाऊ धाडीवाल वेळोवेळी तिला मार्गदर्शन करीत असत आणि दहावीला तिला बोर्डात ९५ टक्के मार्क मिळाले. मुलीची अभ्यासातील ओढ आणि हुशारी पाहून गणेश गवळी यांनी तिच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष देण्याचे ठरविले आणि तिला सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्यासाठी पाठवले.
२०२१ मध्ये प्रतीक्षा या कॉलेजमध्ये चांगल्या कौशल्याने पास झाली आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये व्हेरीटास कंपनीने तिला दहा लाख पंचाहत्तर हजार रुपयांचे पॅकेज देऊन नोकरी दिली. प्रतीक्षा या कंपनीत अत्यंत मन लावून काम करू लागली. जवळपास सहा महिने या कंपनीत काम केल्यानंतर तिला अरिस्टा या कंपनीची ऑफर चालून आली आणि प्रतिक्षाने तिथे इंटरव्यू दिला. या कंपनीच्या सर्व नियमात ती पास झाली आणि कंपनीने चक्क अठरा लाख पंन्नास हजार इतके पॅकेज देऊन तिला नोकरी दिली. यामुळे आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले हे गणेश गवळी मन भरून बोलतात. मात्र याच बरोबर या सर्व गोष्टीत वर्धमान भाऊ धाडीवाल यांची असलेली भक्कम साथ प्रतीक्षाला इथपर्यंत घेऊन आली आणि मी ते करू शकलो असं सांगायला ते विसरत नाही. आईविना वाढलेली ही मुलगी आज गवळी समाजात एवढे मोठे पॅकेज घेणारी जिल्ह्यातील एकमेव ठरली असावी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्या वडिलांच्या गरिबीची आणि मेहनतीची जाणीव ठेवून अत्यंत कष्टाने इथपर्यंत यशस्वी मजल मारलेल्या प्रतिक्षा गणेश गवळी हिचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.