जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांना महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, यांना सुद्धा अनुदान तीनपट करणे, दर्जा बदल करणे व वाचनालयांना स्वतःच्या इमारत बांधण्यासाठी शासनाने मोफत जागा उपलब्ध करून देणे अशा प्रमुख तीन मागण्या बाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सामंत यांनी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रंथालयांना अनुदान वाढवून देऊन त्याचे प्रलंबित मागण्या पूर्ण करण्या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिफारस केली. शालिनी इंगोले यांनी सुद्धा अनुदान वाढीव संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे नमूद केले. उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आपले प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित असून शासन त्या वरून सकारात्मक असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आपले अनुदान तात्काळ वाढवून देण्यात येईल व दर्जा वाढी संदर्भात सुद्धा प्रश्न विचाराधीन असून येणाऱ्या बजेट मध्ये आपला प्रश्न मार्गी लावला जाण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
याप्रसंगी आ.शिरीष चौधरी, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, प्रदेश ग्रंथालय सेनेचे उपप्रमुख पी एम पाटील, विभागीय संघटक डॉ प्रशांत पाटील, जिल्हा प्रमुख सतीश पाटील, संघटक रवींद्र पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी.पाटील व जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालयाचे कर्मचारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.