जळगाव, प्रतिनिधी – जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेतल पाटील, प्रेरणा मिश्रा, तनवीर शेख आणि किरण राजपूत या चारही उमेदवारांनी पारंपरिक भाषणं, बॅनर-पोस्टरऐवजी थेट आपल्या कपड्यांवरच प्रभागातील समस्या लिहून जनतेसमोर मांडण्याचा प्रयोग केला.
महिला उमेदवारांनी साडीवर तर पुरुष उमेदवारांनी शर्टवर प्रभाग क्रमांक ६ मधील ज्वलंत प्रश्न ठळक शब्दांत मांडले. हरवलेले रस्ते, तुंबलेल्या गटारी, बंद पथदिवे, भकास उद्याने, लादलेले नगरसेवक, बेवारस प्रभाग असे मुद्दे उमेदवारांच्या कपड्यांवर लिहिलेले पाहून मतदारही थांबून वाचत होते. त्यामुळे प्रचार केवळ पाहण्यापुरता न राहता थेट जनतेशी संवाद साधणारा ठरला.
या अभिनव प्रचारामुळे आपल्या समस्या कुणीतरी ऐकतोय” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असून, नागरिकांनीही या कल्पक उपक्रमाचे कौतुक केले आहे. शहरात या आगळ्यावेगळ्या प्रचाराची चांगलीच चर्चा रंगली असून, प्रभाग ६ मधील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
परंपरागत राजकारणाला छेद देत जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारा हा प्रचार जळगावच्या निवडणूक इतिहासात लक्षात राहणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.















