जळगाव (प्रतिनिधी) दहावी, बारावीसह एमचटी- सीईटीच्या परीक्षेसाठी परिक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2021 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. तसेच 2021-22 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधीनिर्माण शास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने 20 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत PCM ग्रुप व 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत PCB ग्रुपची परीक्षा जळगाव शहरात सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 प्रथम सत्र व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 व्दितीय सत्र, अशा या दोन सत्रात जळगाव शहरातील एकूण 6 परीक्षा केंद्रावर होणार आहे.
16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाहीत. परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस. टी. डी/आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्युर्टर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरू असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवावेत. सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे, असेही जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.