धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यात बांभोरी येथील सरपंच पदासाठीच्या निवडणूक प्रक्रियावर स्थगिती आणणे तसेच बांभोरी गावाचे सरपंच पदाचे उमेदवार सचिन बिऱ्हाडे यांना मारहाण करत अपहरण करणारे आरोपी कोण तसेच बिऱ्हाडे यांना न्याय व संरक्षण मिळावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
धरणगाव तालुक्यात बांभोरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सचिन बिऱ्हाडे हे सरपंच पदासाठी नामांकन भरण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करत सरकारी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला, तसेच सचिन बिऱ्हाडे यांचे अपहरण करून त्यास पाच ते सहा तास डांबून ठेवले होते. याघटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सचिन बिऱ्हाडे यांचे अपहरण करणारे आरोपी तसेच या प्रकरणाचे सूत्रधार कोण याची सखोल पोलीस चौकशी करून संबधित आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.