पुणे (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणामुळे राठोड यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये आणि आमचा कोणावरही आरोप नाही. त्यासोबतच पोलिसांच्या तपासानंतर संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने सुद्धा संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.