धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली सुरूच आहे. अशातच आज शहरातील पाळधी वाड्यात लग्न समारंभात मोठ्या प्रमाणातील गर्दी मंडपात मावत नव्हती. या विवाह सोहळ्यात ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्याने नवरदेवाच्या वडिलांकडून रुपये ५००० ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पाळधी वाडा धरणगाव येथे लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत आल्यामुळे तहसीलदार नितीन कुमार देवरे, नगरपालिका कर्मचारी जयेश भावसार, मंडळाधिकारी वनराज पाटील, महसूल कर्मचारी गणेश पवार, पंकज शिंदे वाहन चालक मनोज पाटील त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांच्या संयुक्त पथकाने सदर लग्न समारंभवर कारवाई केली. या कारवाईमध्ये नवरदेवाच्या वडिलांकडून रुपये ५००० ची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर अशा पद्धतीची गर्दी किंवा कोणत्याही प्रकारचा नियमांचा भंग झाल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिला आहे.