जळगाव (प्रतिनिधी) देशभक्ती वाढविणेकरीता महापालिकेची प्रशासकीय इमारत सरदार वल्लभभाई पटेल टॉवरवर भारताचा तिरंगा झेंडा लावण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महानगरपालीकेच्या सरदार वल्लभभाई पटेल टॉवरवर भारताचा तिरंगा झेंडा लावण्याबाबतची मागणी आम्ही करीत आहोत. असा तिरंगा झेंडा लावल्यास जळगाव महानगरपालीका ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारत देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा लावणारी एकमेव महानगरपालीका म्हणून गौरवास येईल व अश्या प्रकारे हा एक जळगांवकरांना सुद्धा अभिमान वाढीस कारणीभूत होईल व त्याद्वारे सर्व भारत वासियांचे देशभक्ती प्रती आदर वाढेल.
जळगाव महानगरपालीकेचे सरदार वल्लभभाई पटेल टॉवर हे अंदाजे १०-१५ किलोमीटरच्या परीसरापर्यंत दृष्य आहे त्यावरील तिरंगा झेंडा हा आणखी दुरपर्यंतच्या नागरीकांना दिसेल व याद्वारे जळगांव महानगरपालीकेचा गौरव वाढवेल. तरी यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदरहु तिरंगा झेंडा लावण्याबाबतची कार्यवाही करावी, अश्याच प्रकारचे पण खालच्या पातळीवरील तिरंगा झेंडा हज कमीटी बिल्डींग, मुंबई येथे, भुसावळ येथे रेल्वे यार्डात, अमळनेर येथील नगरपालीका येथे आजही तिरंगा झेंडा मोठ्या शानमध्ये फडकत आहे, तसेच त्याची निगा देखील राखली जात आहे. तरी सदरहु बाबतीत आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी व जळगांवकरांची ही मागणी पुर्ण करावी, असे यात म्हटले आहे.
















