धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी.आर.हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सुप्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार आणि पत्रकार प्रा. बी.एन.चौधरी यांना अहमदनगरच्या “कुबेर फाऊंडेशन” आणि “कुबेर समुह” च्यावतीने “कुबेर शिक्षक सन्मान – २०२१” जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर समुहाने उपक्रमशील शिक्षकांत शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानानिमित्त हा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन समुह प्रमुख संतोष लहामगे यांनी म्हटले आहे.
प्रा. चौधरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३४ वर्षे सेवा करुन भरीव योगदान दिले आहे. उपक्रमशील शिक्षक आणि कुशल प्रशासक, मुख्याध्यापक म्हणून ते परीसरात प्रसिद्ध आहेत. शालेय शिक्षणासोबत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्य लिहले आहे. खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि एकमेव मार्मिक पुरस्कारप्राप्त व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल यापुर्वी त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो. एकदा शिक्षक झाला, म्हणजे खरा शिक्षक आयुष्यभर शिक्षकच राहतो. तो सतत शिकत आणि शिकवतच राहतो. कारण शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे असे प्रा. चौधरी म्हणाले. कोरोना काळात मिळालेल्या या सन्मानाचे आपल्यासाठी “कोरोना-लस” एव्हढेच महत्व असून, यामुळे आपल्या मनाला इम्युनिटी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. इम्युनिटी फक्त शरीरालाच नाही तर मनालाही आवश्यक असते आणि पुरस्कार, सन्मान हे मनाच्या इम्युनिटीसाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पुरस्काराने सन्मान तर मिळतोच, मात्र जबाबदारीही वाढते असे ते म्हणाले. कुबेर सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.