जळगाव (प्रतिनिधी) सभा घेणं हा राज ठाकरे (Raj Thakre) यांचा छंद आहे, मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही, ते केवळ ‘एजंट’ म्हणून काम करतात असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज लगावला. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे. मात्र त्यांना यश मिळत नाही. अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे. पाटील म्हणाले, अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते. त्यांच्याकडे एकही पालिका नाही, त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाऊंट कोरेच आहे, बीना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही, जनतेने त्यांना यश दिले पाहिजे.
गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांतील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, राज ठाकरे हे कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतात, ते आता कोणाचे एजंट आहेत सर्व जनतेला माहीत आहे. दर पाच वर्षांनी त्यांची भूमिका बदलत असते. पहिली भूमिका काय?, पक्ष स्थापनेची भूमिका काय?, झेंड्याची भूमिका काय?, आता तर झेंड्यात इंजिन घुसले आहे. स्वतःच्या पक्षाची भूमिका बदलवितो त्या माणसाला यश मिळत नाही. ते मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे.
राज ठाकरेंच्या सभेला अटी-शर्तींसह परवानगी
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसंच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करु नये, अशी अट घातली जाणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे.