नवी मुंबई (वृत्तसंस्था) व्हिडीओ गेम पार्लर चालकाला मारहाण करून ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रेसह आणखी सहा जणांविरुद्ध नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळमधील दिघा परिसरात पवन मेलगडे यांचा व्हिडीओ गेम पार्लरचा व्यवसाय आहे. हे पार्लर चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळमधील दिघा परिसरात पवन मेलगडे यांचा व्हिडीओ गेम पार्लरचा व्यवसाय आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनियर असलेले तक्रारदार पवन मेलगडे नेरुळ येथील शिरवणे गावात राहतात. बेरोजगार असल्यामुळे पवन यांनी दिघ्यातील व्हिडीओ गेम पार्लर भाड्याने चालवायला घेतले. १९ नोव्हेंबरला पवन आणि त्याचा मित्र दत्तात्रय नागरे हे दोघे व्हिडीओ गेम पार्लरमध्ये बसलेले असताना राहुल आंग्रेसह त्याच्या साथीदारांनी पवन आणि त्यांच्या मित्राला मारहाण करत पार्लर चालू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजारांची मागणी केली.
पवनने मागणी नाकारल्याने राहुल आंग्रेने पवन यांच्या मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. पवन मेलगडे यांच्या तक्रारीनुसार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अन्नू आंग्रे याच्यासह अन्नूचा भाऊ राहुल आंग्रे, प्रवीण अंचन (पुजारी), मंगेश टेमकर, रोशन नाईक, सुरज उर्फ पप्पू पटेना, परेश भोई या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रबाळे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
















