परभणी (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ED) परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी ED कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या तीनही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग कायद्या अंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
२०१७ साली परभणी च्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर उस पुरवला. त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करून पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँक याच्याकडून तब्बल ३२८ कोटींची रक्कम परस्पर उचलली. जेंव्हा याबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्या तेंव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. त्यावेळी रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली. २८ फेब्रुवारीला २०१९ गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड, डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेड मध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करून गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश एस जी दुबाले यांच्यासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ५ मार्च २०२० मध्ये जामीन मिळाला. जवळपास वर्षभरानंतर ते बाहेर आले. दरम्यान, गुट्टे यांनी कारागृहातूनच २०१९ मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले हे विशेष. २६ मार्च २०१९ रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर त्यांना तब्बल ३४६ दिवसानंतर जामीन मंजूर केला होता.
ईडीने अशी माहिती दिली आहे की, कर्जातून मिळालेली रक्कम बनावट शेतकरी किंवा मृत शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली गेली. त्यानंतर ती साखर कारखान्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. या घोटाळ्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उचलून धरला होता. गुट्टे यांचे कुटुंब दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे.