जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ च्या कार्यालयातील रद्दीची परस्पर विक्री केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही बाब मनपा अधिकाऱ्यांच्या कानावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने प्रभाग समिती अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून जाब विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी संबधित रद्दीच्या दुकानातून ती रद्दी परत आणून महापालिकेच्या इमारतीत जमा केली आहे.
मेहरूण परिसरात असलेल्या मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ३ च्या कार्यालयात पडून असलेली तीन टेम्पो भरुन रद्दी तेथील एका अधिकाऱ्यांने परस्पर विक्री केल्याची घटना बुधवारी उघड झाली. याबाबत मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती मिळताच त्यांनी प्रभाग समितीमधील त्या संबधित अधिकाऱ्याला फोन करून रद्दी परस्पर कशी विक्री केली ?, याचा जाब विचारला. त्यावर संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
आपण केलेला प्रकार उघडकीस आल्याचे समजताच त्या अधिकाऱ्यांने जेथे रद्दी विक्री केली होती. तेथून ती रद्दी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मनपाच्या प्रशासकी इमारतीत आणून जमा केली. रद्दी विक्रीची माहिती व आली आहे. याप्रकरणी प्रभाग समिती क्रमांक तीनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून त्यांना नोटीस बजाविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मनपा उपायुक्त गणेश चाटे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.