डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने सेवानिवृत्तास २१ लाखांचा गंडा !
नाशिक (प्रतिनिधी) डिजिटल अरेस्टचा बहाणा करून सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्तास एकवीस लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सहभाग असल्याची धमकी देत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारला असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धासमवेत गेल्या जुलै महिन्यात सायबर भामट्यांनी संपर्क साधला होता. वेगवेगळ्या मोबाइल नंबर्सवरून संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यातून सबइनस्पेक्टर संदीप रॉय बोलत असल्याचे सांगून तुमच्या कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मनी लाँडरिंग झाल्याचे सांगितले. यानंतर भामट्यांनी त्यांना धमकावत सर्व आर्थिक व स्थावर मालमत्ता तपशिलांची माहिती तपासणीच्या नावाखाली घेत, वृद्धास कारवाई टाळण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांत रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणात २१ लाख १३ हजार २३६ रूपयांची फसवणूक झाली असून, वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील तपास करीत आहेत.
















