धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘आरएफआयडी’ या प्रणाली बसविण्यात आली आहे. या यंत्रणेने आता पोलिसांची हजेरी समजणार असून, यामुळे शहरातील चोरींना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकणार आहे.
शहरासह कॉलनी भागात १४ ठिकाणी बसवल्या मशिन
शहरासह कॉलनी भागात विविध अशा १४ ठिकाणी या टॅग बसविण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रीची गस्त बंधनकारक झाली आहे. या मशिनमध्ये गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव, बक्कल नंबर सेव्ह करण्यात आले असून, यावरून कर्मचाऱ्यांची गस्त घालताना नेमून दिलेल्या ठिकाण गेल्यावर बसवलेल्या टॅगवर आपल्या जवळील मशीनने लेसर पॉइंट टच करावा लागेल. यानंतर कोणता कर्मचारी किती वाजता कोणत्या भागात गस्त घालत होता. याची नोंद पोलीस स्थानकातील मुख्य संगणकाला होईल. जळगाव शहरात प्रथम ट्रायल बेसिसवर याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते, त्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.
आरएफआयडी म्हणजे काय ?
आरएफआयडी म्हणजे ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाइस’ हे डिवाइस लेसर गन पद्धतीच्या छोट्या मशीनवर कार्य करते. पोलिस कर्मचारी हे रात्री पेट्रोलिंग करत असताना ज्याठिकाणी जातील तेथे आपल्या सोबत असलेल्या डिव्हाइसने बसवलेल्या टॅग कार्डवर मशिन धरतील. लेसर लेसर पॉइंट टच होईल. त्यानुसार त्यांची गस्तीची हजेरी मोजली जाईल. धरणगाव शहरातील अनेक दाट लोकवस्ती भागात टॅग कार्ड बसवण्यात आली आहेट. या प्रणालीमुळे पोलिसांची गस्त वाढण्यासह नियमित होणार आहे. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या प्रयत्नातून ही यंत्रणा धरणगावात पहिल्यांदा आली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
शहरात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेच्या दरम्यान शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दुपारी शहरात फिरणारे फेरीवाले व हातगाडीवाले यांच्याकडे नजर ठेवून चौकशी करावी, संशयास्पद वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवावा. असे केल्यामुळे चोऱ्या होणार नाही. शिवाय कुणी नागरीक बाहेरगावी जात असतांना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नये आणि जातांना शेजारच्यांना सांगून जावे असे आवाहन देखील धरणगाव पोलिसांनी केले आहे.
पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्यां इच्छुकांनी संपर्क करावा
धरणगाव शहर हे दाट लोकवस्तीचे आहे. मागील काही दिवसापासून बंद घरे फोडणे, मोटार सायकल चोरी सारख्या घटना रात्रीच्या वेळेस घडत होत्या. पोलिसांची गस्त नियमित झाल्यास या गोष्टी रोखता येऊ शकतात. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून पोलिसांना सूचित करावे.
– शंकर शेळके (पोलीस निरीक्षक)