नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान, पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार, बस आणि ट्रकमध्ये 90 अंशाच्या कोनात धडक झाली. चौक ओलांडत असताना धावत्या बसची समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे बसच्या डिझेल टँकचा स्फोट होऊन आग लागली. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.
प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला
नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या. परंतु जे प्रवाशी तर आतमध्ये अडकले होते त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.
बसचा अक्षरश: कोळसा, अनेक प्रवाशांचा मृत्यू
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.