भंडारा (वृत्तसंस्था) भंडारा तालुक्यातील सोनुली येथे सख्ख्या भावानेच बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. ही घटना रविवारी (२४ डिसेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली.
सोनुली येथे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करणारे गोपीचंद बावनकुळे आपल्या पत्नी, मुलगी व मुलासह अनेक वर्षांपासून राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व्यावसायिक शिक्षण घेत असलेली अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी (२२ डिसेंबर) सोनुली येथे आली होती.
घटनेच्या दिवशी आई साकोली तर वडील कन्हानला कार्यक्रमानिमित्त गेले होते, दरम्यान, आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघेही घरीच होते. अशातच दुपारी बहीण-भावांत करता गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावात शुकशुकाट होता. दरम्यान, पोलीस पाटलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला, तोपर्यंत पोलीस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळा दाबल्याच्या खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढविली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. मृत तरुणीची गळा आवळून हत्या झाली असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस चौकशीत आशिषने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी भावि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.