मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील साकीनाका येथे एका टेम्पोत ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. दुर्दैवाने पीडितेची मृत्यूशी झुज थांबली आहे. या घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली. घटनेनंतर काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एक महिन्यात हा गुन्हा संपूर्णपणे उघडकीस आणू, असे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.”, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी पत्रकार परिषदेत दिली.
“गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. ९ आणि १० सप्टेंबरच्या रात्री साधारण ३ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं”, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं. “संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आतमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थित आढळली. त्यावेळी त्यांनी तातडीने निर्णय घेऊन महिलेला इतरत शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी चौकीदाराकडून घेऊन स्वत: पोलिसांनी गाडी चालवत ताबोडतोब राजावाडी हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केलं. डॉक्टरांनी पीडितेवर त्वरित उपचार सुरु केले होते”, अशी माहिती त्यांनी दिलीय.
“पोलिसांनी वॉचमनच्या तक्रारीवरुन साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. साकीनाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, क्राईम ब्रांचचे कर्मचारी सगळ्यांकडून तपास सुरु होता. संबंधित परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक करण्यात आले. त्यावरुन एक आरोपी ज्याचं नाव मोहन आहे, तो युपीचा राहणारा आहे. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. या आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले. त्यावर रक्ताचे काही डाग आढळले आहेत. तपासातून ते महिलेचे रक्ताचे डाग आहेत ते खात्री करावे लागेल”, असं नगराळे म्हणाले. आरोपी मोहनला अटक केली आहे. त्याची २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेतलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी ज्योस्ना रासम या अनुभवी महिला अधिकारी आहेत. त्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली एक स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम तैनात केली आहे. पुढच्या येणाऱ्या एक महिन्यात हा गुन्हा संपूर्णपणे उघडकीस आणू. त्याचा तपास पूर्ण करण्यात येईल. आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे की, हा गुन्हा फास्टट्रॅकवर चालवू”, असं आयुक्तांनी सांगितलं.