मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सिनेसृष्टीशी निगडीत हजारो मजुरांना आर्थिक मदत केली होती. सलमानने आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील २५ हजार मजुरांना मदत करण्याची घोषणा केली आहे.
सलमान खानने २५ हजार कामगारांच्या बँक खात्यात १५०० रुपये प्रत्येकी असे एकूण ३.७५ कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील वर्षी आम्ही फेडरेशनच्या वतीने सलमान खानला २६ हजार गरजू कामगारांची आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचा तपशील पाठविला होता. त्याच्याकडे आधीपासून असलेल्या या नावांपैकी सलमान खानने एकूण २५ हजार लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यांत लाईटमॅन, स्पॉटबॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट यांचा समावेश आहे.
सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे’ येत्या १३ मे ला रिलीज होणार आहे. करोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी आणि थिएटर दोन्ही ठिकाणी रिलीज होणार आहे. झी एंटरटेनमेन्ट आणि सलमान खान फिल्मनं घोषणा केली आहे की, ‘राधे’ चित्रपटातून होणारी सर्व कमाई करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सलमानच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेकडून जवळपास २ लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमान खाननं आर्थिक मदतही देऊ केली होती. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित २३ हजार लोकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. यानंतर सलमाननं दोन वेळा १५००-१५०० रुपयांची आर्थिक मदत केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी इंडस्ट्रीशी संबंधित गरजू लोकांना १५ कोटींची आर्थिक मदत केली होती.