धरणगाव (प्रतिनिधी) काही महिन्यांपासून धरणगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. मागील आठ महिन्यात वाळू चोरांना एकत्रित ५३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ३० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३८ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. थोडक्यात धरणगाव तालुक्यातील वाळू माफिया महसूल विभागाच्या रडारवर आले आहेत.
तालुक्यातील तापी व गिरणा नदीपात्रातील बांभोरी प्र.चा, भोकणी, आव्हाणी, निंभोरा, चांदसर, नांदेड, नारणे, बाभुळगाव, बांभोरी प्र.चा. या परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी धरणगाव तहसील कार्यालयामार्फत दिवसरात्र कर्मचाऱ्यांच्या भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सन २०२२-२३ या काळात एकूण २० वाहनांविरुध्द २७ लाख ६३ हजारांचा दंड आकारला होता. यात २१ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिलपासून आतापर्यंत एकुण ३८ वाहनांविरूध्द दंडाची कार्यवाही करण्यात आली आहे. यात ५३ लाख ३१ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. गतवर्षी एकुण २० कारवाया करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ज्या वाहनधारकांनी दंडाची रक्कम शासनाकडे जमा केली नाही, त्या वाहन धारकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी तहसील कार्यालयातर्फे १५ नोव्हेंबरला वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ७ वाहनांना बोली लावून १२ लाख ३३ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. दरम्यान, नदीपात्रातून वाळूची चोरी होवू नये, याकरिता आव्हाणी येथे तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचे बैठे पथक तसेच बांभोरी प्र.चा., भोकणी, निंभोरा, चांदसर या भागात गस्त घालण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे फिरते पथक कार्यरत आहे. अत्यंत कमी मनुष्यबळ असून ही प्रशासनान रात्रंदिवस गस्त घालत आहे. नांदेड, नारणे, चमगाव, बाभुळगाव, निंभोरा, चांदसर, आव्हाणी व बांभोरी प्र.चा या ठिकाणी नदीपात्राकडे जाणारे सर्व रस्ते नाल्या खोदून बंद करण्यात आले आहेत.
पुन्हा ५ डिसेंबरला होणार लिलाव !
दंडात्मक कारवाई करुनही ज्या ८ अवैध वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक मालकांनी दंड भरला नाही, त्यांच्या वाहनांच्या लिलावाची कार्यवाही १५ रोजी तहसरीलदारांच्या वतीने करण्यात आली. यामुळे २ वाहनांचा मालकांनी दंड भरला. तर वाहन लिलावात न गेलेल्या वाहनचालक व मालक यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा शोध घेवून त्यांच्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार बोजा चढवण्यात आला. तसेच २५ ऑक्टोबरला लिलाव ठेवला होता. त्यामुळे स्थावर मालमत्ता घर, शेती शासनजमा होवू नये म्हणून ३ वाहनमालकांनी ३ लाख ६७ हजारांचा दंड भरला आहे. तसेच उर्वरित ३ वाहनधारकांच्या मालमत्तेचा पुन्हा ५ डिसेंबरला धरणगाव तहसील कार्यालयात लिलाव होणार आहे.
३० जणांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई !
जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सन २०१३ ते २०२३ अशा गत १० वर्षात अवैध गौण खनिज वाहतूक करताना गुन्हे दाखल झालेल्या वाहनचालक व मालकांची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याकडून मागवण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १०७नूसार एकुण ३० जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच १ एप्रिलपासून वाळू चोरी करताना पकडलेल्या ३८ वाहनांच्या मालकांवर फौजदारी प्रक्रियेनुसार इस्तेगासा सादर करण्यास धरणगाव व पाळधी पोलीसांना कळवले आहे. तर ६ प्रकरणांत नव्याने पोलीस ठाण्यात संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
– महेंद्र सूर्यवंशी (तहसीलदार, धरणगाव)