जळगाव (प्रतिनिधी) वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाई करणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील मुख्य संशयीत विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर) याच्या शनिवारी पाचोरा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
अवैध वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे जात होते. यावेळी त्यांच्या वाहनासमोर वाळूने भरलेले डंपर जात असतांना त्यांनी डंपरचा पाठलाग करुन डंपर थांबविले. चालकाकडे वाळू संदर्भात असलेल्या परवाना व कागदपत्रे मागितली असता, चालकाने तेथून डंपर पळवून नेले होते. उपजिल्हाधिकारी कासार यांनी पुन्हा डंपरचा पाठलाग केल्यानंतर चालक डंपर सोडून पसार झाला होता. दरम्यान, वाळू माफिये कार व दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर टॉमीने हल्ला करुन त्यांचे वाहनाची तोडफोड केली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात १६ वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठल पाटील व गौतम पानपाटील यांच्यासह सहा अशा एकूण आठ जणांना नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
यातील मुख्य संशयित विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा सपकाळे हा पाचोरा बस स्थानक परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करुन रवाना केले. त्यानंतर पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच नशिराबाद पोलिसांनी मयुर पाटील याला साकेगाव येथून ताब्यात घेतले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
….या पथकाची कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे अधिनस्त पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, राजेश मेंढे, पोना विजय पाटील यांच्यासह पाचोरा पोलीस ठाण्याचे पोना राहुल बेहेरे यांच्या पथकाने केली.