जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या नवीपेठ शाखेतील दगडी बँक विक्रीच्या प्रस्तावाला आमदार एकनाथ खडसे यांनी विरोध दर्शवत चेअरमन संजय पवार यांना पत्र पाठवले होते. मात्र खडसेंच्या या भूमिकेला उत्तर देताना चेअरमन संजय पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या भावना कुठे होत्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पवार म्हणाले, “खडसेंच्या संचालक पदाच्या काळात जिल्हा बँकेच्या ताब्यातील मधुकर साखर कारखाना, जे. टी. महाजन सूतगिरणी, बेलगंगा व वसंत साखर कारखान्यांची मालमत्ता तसेच अमळनेर येथील अडीच हेक्टर जमीन विकण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या भावना कुठे होत्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नवीपेठेतील दगडी बँक ही सध्या वापरात नसून इमारत जीर्ण झाल्याने धोका निर्माण झाल्याचे कारण संचालक मंडळातील इतर सदस्यांनी दिले आहे. त्यामुळे तिची विक्री करणे आवश्यक असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.
संजय पवार यांनी खडसेंच्या काळातील मालमत्ता विक्रीची यादी वाचून दाखवत, “विरोध करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारकिर्दीकडे पाहावे” असा इशारा दिला. एवढेच नव्हे तर “खडसे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करू” असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला.
 
	    	
 
















