कोल्हापूर (वृत्तसंस्था) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. किमान संजय राऊत यांनीही हे मान्य केलं की, त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते.
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते एकमेकांवर दोस्तीवरुन शाब्दीक कुस्ती करताना दिसत आहेत. आता, वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात, तो वाघच असतो. हिंमत असेल तर वाघाशी मैत्री करायला पिंजऱ्यात या, महाराष्ट्रात वाघाचे राज्य आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. संजय राऊतांच्या या विधानावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. किमान संजय राऊत यांनीही हे मान्य केलं की, त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना चंद्रकांत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी इतका जोर लावला तसा जोर मराठा आरक्षणाच्या बाबतीत का लावला जात नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या सवलती देणे शक्य आहे ते देखील सरकार देत नाही. महाराष्ट्राचं वाटोळ या सरकारने लावलं आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी नव्हे तर जंगलातील वाघाशी मैत्री करतो.