बोदवड (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कठोर कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच, सौ. पूनम मोहन पाटील यांनी २६ जानेवारीपासून बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मानमोडी, ता. बोदवड येथील देखभाल व दुरुस्ती योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामासाठी एकूण १४,०२,३७०/- रुपये मंजूर करण्यात आले होते. यासाठी समितीला प्रथम हप्ता ४,०३,७११/- रुपये आणि द्वितीय हप्ता ८,४१,४२२/- रुपये मिळाले, ज्यामुळे एकूण रक्कम १३,४४,१३३/- रुपये वितरीत करण्यात आली होती. योजनेत पाणी पुरवठ्याची कामे ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत करावयाची होती. मात्र, समितीने त्याद्वारे काम पूर्ण केलेले नाही. शासनाने एक वर्षाची मुदत वाढ दिली होती, तरी काम वेळेत पूर्ण न करता, कामाचे मूल्यांकन न करता १२,४४,१३३/- रुपये खात्यातून काढून घेतले गेले आहेत. वरीष्ठ कार्यालयांकडून वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही, समितीने ७,८४,३४६/- रुपये अफरातफर केले आहेत.
उपविभागीय अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा, जि.प. मुक्ताईनगर/बोदवड यांनी १७ जून २०१७ रोजी व २८ फेब्रुवारी २०२३ रोजी संबंधित समितीला पत्रव्यवहार करून या अफरातफर केलेल्या रकमेशी संबंधित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर २९ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीने संबंधित समितीला ७,८४,३४६/- रुपये सात दिवसांच्या आत भरण्याचे लेखी निर्देश दिले होते. परंतु समितीने यास प्रतिसाद दिला नाही. सदर समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी अफरातफरी केलेल्या रकमेला घाबरून, जुने काम मुदत संपल्यानंतरही चालू ठेवले आहे. या कामाची मुदत नऊ वर्षांपूर्वीच संपली असताना, ते कसे सुरू ठेवले जाऊ शकते, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यावर सरपंच पूनम पाटील यांनी आदेश दिला आहे की, या कामाचे मूल्यांकन, बिले आणि इतर कोणतेही कागदपत्रे संबंधित कार्यालयाने तयार करू नयेत.
२६ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच पूनम पाटील यांनी संबंधित समितीवर तक्रार केली होती आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच १ जानेवारी २०२५ रोजी समितीने चालू केलेल्या कामाचे मूल्यांकन व कागदपत्रे तयार करण्यास विरोध केला होता. यामुळे सरपंच यांनी आपल्या उपोषणाच्या इशाऱ्यात म्हटले होते की, संबंधित समितीवर तीन दिवसांच्या आत फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास, ते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करतील.
तसेच सदर पत्र मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत संबंधित समितीवर फौजदारी गुन्हे न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. जळगाव यांचे दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करेल असा इशारा सरपंच सौ. पुनम मोहन पाटील यांनी दिला होता. तरी कोणतीही कारवाई न झाल्याने सरपंच पूनम पाटील यांनी बोदवड पंचायत समिती कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.