सातारा (वृत्तसंस्था) दांडक्याने मारहाण करून मुलाने वडिलांचा खून केला. त्यानंतर नातेवाइकांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची खळबळजनक घटना कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. तानाजी लक्ष्मण होवाळ (वय ६५, रा. कोपर्डे हवेली) असे खून झालेल्यांचे नाव आहे, तर अभिजित ऊर्फ पप्या तानाजी होवाळ (३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.
तानाजी होवाळ हे पत्नी संगीता, मुलगी सांची, पुनम आणि मुलगा अभिजीत यांच्यासह कोपर्डे हवेली येथे राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी (१७ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास संजय श्यामराव सरगडे हे घराबाहेर उभे होते. त्याचवेळी अभिजीत उर्फ पप्प्या होवाळ हा त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस उभा राहून कोणाला तरी फोनवरून म्हणाला की, ‘मी पप्पाला मारले आहे. मी आता मुंबईला निघालोय,’ असे सांगत होता. त्यानंतर संजय तातडीने होवाळ यांच्या घरी गेले. त्यावेळी तानाजी होवाळ मृत झाल्याचे त्यांनी पाहिले. त्यांच्या अंगावर चादर टाकली होती, त्या चादरीवर काही ठिकणी रक्ताचे डाग त्यांना दिसले. त्याच्या शेजारीच लाकडं पडलेली त्यांनी पाहिली. मयता शेजारी तानाजी होवाळ यांच्या पत्नी संगीता ओवाळ तसेच मुलगी पूनम बसलेल्या दिसल्या. दुसऱ्या दिवशी कोपर्डे येथील स्मशानभूमीत तानाजी होवाळ यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, यानंतर सरगडे यांनी पोलिसांनी सर्व माहिती दिली.