बोदवड (प्रतिनिधी) येथील सर्व सॉ मिलची चौकशी होणार असून तक्रारी नुसार वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पत्रानंतर छावा संघटनेने आपले नियोजित उपोषण स्थगित केले आहे.
तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड व बेकायदेशीर वाहतुक होत असतांना कारवाईकडे वन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष आहे. दि. २० ऑगस्ट रोजी नाडगाव बोदवड रस्त्यावरुन अवैध वृक्षतोड करुन तिची बेकायदेशीर वाहतुक प्रकरणी ट्रॅक्टर अडविण्यात येउन माहिती वन विभागाचे वनपाल, वन क्षेत्रपाल यांना कळविण्यात होती. परंतु, वन विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात लावण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्याने राष्ट्रीय छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांनी वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्याकडे केलेल्या लेखी – तक्रारीनंतर ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला व पुढील तपास सुरु आहे.
शहरातील विविध ठिकाणी तसेच सॉ मिल परिसरात लाकडांचा अवैध साठा सांठविल्याबाबत विशेष पथक नेमुन कारवाई करण्याची मागणी मुख्य वन संरक्षक प्रादेशिक वन विभाग धुळे, उप वनसंरक्षक डॉ. विवेक होशिंग यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारी बनपरिक्षेत्र कार्यालय मुक्ताईनगर येथे हस्तांतरित झाल्यानंतरही विभागाकडून चौकशी करण्यास दिरंगाई होत होती. चौकशीकामी टाळाटाळ होत असल्याने दि. ५ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रीय छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे, तालुकाप्रमुख गजानन पाटिल यांनी दिला होता तसेच वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक दिपाली शिर्के यांना चौकशी पथकातून वगळण्यात यावे, अशी लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना चौकशीतून वगळत वेगळ्या पथकाद्वारे तक्रारींच्या अनुषंगाने तपास व चौकशी कामे सुरु आहेत.
नाडगाव ते बोदवड रस्त्यावरील बेकायदेशीर वाहतुकीची दखल घेण्यात आली असुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास व चौकशी सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करुन ऊपोषण स्थगित करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांचेकडून करण्यात आल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र तपास व चौकशी कामी दिरंगाई, टाळाटाळ झाल्यास राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी पत्राद्वारे छावा संघटनेचे अमोल व्यवहारे यांनी विभागाला कळविले आहे.
बोदवड तालुक्यात बोदवड उपसा सिंचन, राष्ट्रीय महामार्ग नूतनीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. सामाजिक वनीकरण दुर्तफा वृक्षलागवड व गटवृक्षलागवड योजनेत लाखो झाडे कागदोपत्री आहेत. प्रशासनाची भुमिका ही वृक्ष संवर्धनाची नाही. त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटना पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा देणार आहे. आणि चौकशी अंती अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी सॉ मिलवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.