जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तुमचे भविष्य सांगतो, असे सांगून नातीला जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दोन भामट्यांनी हातचालाखी करीत लांबविल्याची घटना बुधवारी नूतन मराठा महाविद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातीकरीता जेवणाचा डबा जातांना घडली घटना !
या संदर्भात अधिक असे की, कानळदा येथील कमलाबाई रामचंद्र सोनवणे ही वृद्धा कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. जळगावातील त्यांच्या नातीला बाळांतपणासाठी शाहूनगरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कमलबाई या नातीकरीता जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. डबा देवून साडेबारा वाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या.
तुमच्या घरी लक्ष्मी आलीय सांगत थांबवले !
दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नूतन मराठा कॉलेजच्या समोर युनिक अकेडमी समोरील रोडने पायी चालत जात होते. याचवेळी दोघं भामट्यांनी त्यांना थांबवले आणि तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो असे म्हणून रस्त्याच्या बाजूला बसवले. बोलण्यात गुंतवणूक कमलबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेत कागदाच्या पुडीत ठेवून भामट्यांनी कागदाची पुडीची अदलाबदली केली. त्यानंतर दुनियादारी चांगली नाही तुझ्या गळ्यातील पोत कागदावर ठेव आणि घरी गेल्यावरच उघड असे त्यांनी वृद्धेला सांगितले.
कागदाच्या पुडीची अदलाबदली !
वृद्धेने गळ्यातील पोत काढून कागदावर ठेवत शाहूनगर परिसरातील हॉस्पिटलमध्ये गेली. यानंतर वृद्ध महिलेने हातातील पुडी आपल्या नातीकडे दिली. तिने पुडी उघडून बघितली असता त्यात सोन्याची पोत दिसून आली नाही. आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी वृद्धेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ सिंकदर तडवी हे करीत आहेत.