जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरून शिवसेनेच्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली कुवत पाहूनच पालकमंत्र्यांवर आरोप करावेत, असा टोला विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी लगावला आहे.
भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज सायंकाळी शिवसेनेच्यावतीने महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. हे भाजप पदाधिकाऱ्यांना दिसत नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट केला. मोहाडी येथील महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ३०० बेडची व्यवस्था केली. जळगाव महापालिकेला आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६१ कोटी रुपयांचा निधी दिला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली पात्रता ओळखूनच पालकमंत्र्यांवर आरोप करावेत. भाजपचे महानगराध्यक्ष पालकमंत्र्यांवर आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. वॉर्डात नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही, ४०० मते त्यांना मिळणार नाहीत, असा टोलाही सुनील महाजन यांनी लगावला.
गेल्या काही वर्षांपासून जळगावकर अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. राजकारणाला जळगावकर अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे, आता तरी विकास कामे होऊ द्या. आरोप-प्रत्यारोप थांबवून विकासासाठी सर्वांनी सोबत या, असा सल्ला देखील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
काल भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘गेल्या दीड वर्षांच्या काळात पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय काम केले’, अशा शब्दात भाजपने निशाणा साधला होता.