धरणगाव (प्रतिनिधी) : शरद बन्सी हा माणूसपण जपणारा निर्भिड पत्रकार होता. पत्रकारीता करतांना सकारात्मक आणि मुल्यवर्धक बातम्यांचा शोध घेण्यात त्यांनी यश संपादन केले होते. त्यांचा नावाचा पुरस्कार दिलिप वैद्य यांना प्रदान करुन, त्यांच्या मित्र परिवाराने सकारात्मक, सार्थ काम सुरु केले आहे, असे प्रतिपादन डी. जी. पाटील यांनी व्यक्त केले. पी. आर. हायस्कूलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. शरद बन्सी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वर्षापासून शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार सुरु करण्यात आला. तो रावेर येथील जेष्ठ पत्रकार दिलिप रत्नाकर जोशी यांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. जी. पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, १०००रु.किमतीची ग्रंथसंपदा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. मित्राच्या स्मृतीत असे विधायक कार्य सुरु करणाऱ्या फाऊंडेशनची पाटील यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. नगराध्यक्ष निलेश चौधरी, डॉ. मिलिंद डहाळे यांनी प्रसंगोचित मनोगत व्यक्त करुन शरद बन्सी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात पी. आर. हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक तसेच पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे दुर्दैवी निधन झाले होते. शिक्षण, साहित्य, संस्कृती, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात शरदने लक्षवेधी काम केले आहे. त्यांच्या आठवणी जिवंत रहाव्यात म्हणून, त्यांच्या मित्रांनी एकत्र येत, स्व. शरद बन्सी स्मृती फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून शरद बन्सी करत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पुरस्कार्थींचा परिचय माजी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, सुत्रसंचलन एस. के. बेलदार यांनी तर आभार प्रदर्शन मेजर डी. एस. पाटील यांनी केले. या प्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, संचालक अजयशेठ पगारिया, ईश्वरलाल बन्सी, श्रीमती मिना बन्सी, हेमेंद्र नगारीया, प्रकाश पाटील, कु. कामिनी वैद्य, कैलास पवार, विजय शुक्ला, आबा वाघ, मनोहर बन्सी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















