धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज सकाळपासून अवघ्या काही तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी देखील चार रुग्णांचा ऑक्सिजन अभावी झाला होता. दरम्यान, रुग्णालयात आणखी ८ ते १० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे जिल्हा शल्य चिकीत्सकांचे एक पथक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहे.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज पहाटे पाच वाजेपासून तर १० पर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मयत रुग्णांचे वय साधारण ५५ ते ७० वर्षे असल्याचे कळते. दरम्यान, धरणगाव ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात अवघे दहा ऑक्सिजन बेड असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३० ते ३५ आहे. यामुळे उपचार घेत असताना ऑक्सिजन अभावी बुधवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात एक रुग्ण खर्दे येथील तर तीन धरणगाव शहरातील रुग्णांचा समावेश आहे. मयत रुग्णांचे वय ५५ ते ६५ दरम्यान होते. अवघ्या दोन दिवसात तब्बल ९ रुग्ण दगावल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सकांचे एक पथक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत.