जळगाव (प्रतिनिधी) महिलांच्या वेशात आलेल्या तीन पुरुषांनी शहरातील वाटिका आश्रम परिसरातील घरात घुसून जबरदस्तीने पैसे लुटल्यामुळे प्रचंड घबराहटीचे वातावरण पसरले होते. परंतू पोलिसात कोणीही तक्रार देण्यास समोर न आल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.
शहरातील खोटे नगर शेजारी वाटिका आश्रम परिसरात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास महिलांच्या वेशात ( किन्नर) आलेले तीन पुरुष आले. त्यांनी वेगवेगळ्या उघड्या घरांतून समोर आलेल्या लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळायला सुरुवात केली. एक 14 वर्षीय मुलगी घरात साफसफाई करत होती. या किन्नरमधील एक जण घरत येऊन त्याने वृद्ध महिलेला ढकलून देत मुलीचा गळा पकडून घरातून पैसे काढून आणायला सांगितले. भेदरलेल्या मुलीने त्याला साडेतीन हजार रुपये काढून दिले. यानंतर या भामट्यांनी एका तरुणाला आशीर्वाद देतो असे सांगितले. त्यावर तरुणाने पाकीट काढून त्यातून दहा रुपये देऊ केले. परंतू त्यांनी तरुणाचे पाकीटच हिसकावून त्यातील हजार रुपये काढून पाकीट परत दिले. दरम्यान, तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
















