नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर- सावनेर मार्गावरील नांदा शिवारातील किल्ले कोलार या निर्जनस्थळी फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर गोळ्या झाडून लुटपाट केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री सुमारास घडली. तिघांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण बोंडे (रा. नागपूर) याच्यासह त्याची २४ वर्षीय मैत्रीणही जखमी झाली आहे.
या संदर्भात स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तांमध्ये म्हटले आहे की, की, सोमवारी रात्री प्रवीण आणि त्याची मैत्रीण हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते. जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीने घरी जायला निघाले. हायवे ने सरळ न जाता दोघेही किल्ले कोलार या मार्गाकडे वळले. कोलार नदी पूल क्रॉस करून नांदा येथील अर्धनारी नटेश्वर दहन घाट समोरील निर्जनस्थळी गेले. गाडी रस्त्याकडेला उभी करून फिरायला गेले. काही वेळाने दोघेही त्यांच्या दुचाकी वाहनाजवळ आले. तीन अज्ञात युवक एका दुचाकीने जवळ आला. त्यांना धमकी देऊन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याचा दोघांनी विरोध करताच अज्ञात तिघांपैकी एकाने प्रवीणला धरून ठेवले. त्यानंतर प्रवीण आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीकडील रोकड,मोबाइल फोन बळजबरी हिसकावून घेत मोटारसायकलने पळ काढायला लागले.
तिघेही आरोपी युवक दुचाकीवर बसून पळ काढत असतांना तरुणीने मागे बसलेल्या युवकाला ओढले. यावरून दुसऱ्या युवकाने त्याच्या जवळील बंदूक काढून त्यांच्यावर ताणत थेट दोन ते तीन गोळ्या झाडल्या. यातील बंदुकीतून निघालेली एक गोळी प्रवीणच्या उजव्या पायाला लागली. बंदूक असलेल्या आरोपीने तरुणीच्या डोक्यावर बंदुकीचा बट मारला. त्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. तिन्ही आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. तरुणी आणि प्रवीण दुचाकीने कोराडी पोलिस ठाण्यात पोहचले आणि सर्व हकीगत सांगितली. धक्कादायक म्हणजे एक दिवसाआधी प्रेमीयुगुलाला लुटल्याची घटना कोराडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोघं घटनेमागील आरोपी एकच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.