मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना नरवेल फाट्याजवळ घडली आहे. व्यावसायिकाकडून मोटार सायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १७ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. याप्रकरणी व्यावसायिकाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. दि. ३० रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते. नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपये रोख असा एकूण १७ लाख ८० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.
रेकीनंतर लुटपाट, चोरटे स्थानिक असल्याची शक्यता !
निलेश सोनार यांच्यावर चोरट्यांनी काही दिवस पाळत ठेवली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सोनार यांच्या दुकानाजवळ रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे त्यांनी घटनेच्या दिवशी कारच्या ऐवजी दुचाकी आणली होती. चोरट्यांनी हीच संधी साधत लुटपाट केली. दरम्यान, झटापटी दरम्यान, चोरटे मराठी बोलत असल्यामुळे ते स्थानिक असल्याची तसेच माहितगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनार यांना चाकू सारख्या शस्त्राने मारल्यामुळे त्यांच्या हाताला १७ टाके पडल्याचे कळते.