जळगाव (प्रतिनिधी) पोलीस उप-निरीक्षकाने धरणगाव शहरातील एका तरुणीची छेड काढल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ कार्यमुक्त करण्यात आली असून कंट्रोल बदली करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एका तरुणीची गवारे नामक पीएसआयने आज छेड काढली. यानंतर भेदरलेल्या तरुणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत. घाबरलेल्या पीएसआयने स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. नागरिकांनी पोलिसांना घटना कळविल्यानंतर काही कर्मचारी संबंधित पीएसआयच्या घरी आल्यानंतर ते त्याला सोबत पोलीस स्थानकात घेऊन गेलेत. यानंतर पोलीस स्थानकात शहरातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार स्मिताताई वाघ, पीसीआब पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे, भाजपचे सुभाष पाटील यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ पीएसआय गवारेचा गोपनीय अहवाल बनवून धरणगाव पोलीस स्थानकातून कार्यमुक्त केले.