धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानका शेजारील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि कोविड लसीकरण केंद्र सुरु आहे. एकाच ठिकाणी टेस्ट आणि लसीकरण सुरु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याठिकाणी अगदी नागरिकांचा गोंधळही उडत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. त्यामुळे आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरण केंद्र वेगळे करावे, अशी मागणी भाजपचे गटनेते कैलास माळी यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे केली आहे.
कैलास माळी यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की,बस स्थानका शेजारील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरण केंद्र सुरु आहे. एकाच ठिकाणी टेस्ट आणि लसीकरण सुरु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याठिकाणी तपासणी येणारा व्यक्ती कोरोनाबाधित असल्यास त्याच्यामुळे इतर नागरिकांनाही कोरोनाबाधित होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट तपासणी केंद्र अन्य ठिकाणी तर लसीकरण केंद्र वेगळ्या ठिकाणी असले पाहिजे. तसेच कोविड लसीकरणासाठी नोंदणी पद्धत सुरु केली पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी जेवढ्या लसी येणार असतील तेवढ्याच लोकांना बोलावले गेले पाहिजे. अगदी एका व्यक्तीच्या लसीकरणाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळेवरच लोकांना बोलावले पाहिजे. जेणे करून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. दरम्यान, सोमवारी जिल्हा परिषदेच्या शाळेत आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरणासाठी मोठी गर्दी उसळली होती.